कोविड ने जगभरात हाहाकार मांडला .. जिथे तिथे रुग्णांची वाढती संख्या , भीतीचे वातावरण , मृत्यू चे तांडव , ढासळती अर्थव्यवस्था , लोकांचे उद्धवस्त आयुष्य आणि बरेच काही … मात्र या प्राणघातक आजारासोबत लढण्यासाठी सज्ज राहिले ते म्हणजे जभरातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी . भूक , तहान , वेळ व आपले वैयक्तिक आयुष्य विसरून जभरातील डॉक्टर्स आपला जीव पणाला लावून काम करत होते . पण या स्थितीत जर आपले कर्तव्य बजावताना एखादा डॉक्टर कोविड पॉसिटीव्ह होतो तेव्हा काय होतं ? समाजासाठी लढणारा कोविड योद्धा जेव्हा स्वतः या प्रक्रियेत पॉसिटीव्ह होतो तेव्हा समाजाची व परिवाराची त्यावर काय प्रतिक्रिया असते ?
मला या काळात आलेला अनुभव मात्र अतिशय दुर्देवी व निराशाजनक होता.
मी व माझे वडील ( स्व डॉ. पुरुषोत्तम नरड ) कोविड च्या पहिल्या लाटेत आपला परीने जमेल इतक्या लोकांना कोविड संबंधी मार्गदर्शन तसेच उपचार करण्याचा प्रयत्न करत होतो . पण त्या परिस्थितीत आम्ही दोघे मात्र पॉसिटीव्ह आढळलो . मी व माझे वडील मेयो हॉस्पिटल ( इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज व रुग्णालय ) नागपूर येथे उपचार घेत असतांना माझ्या गरोदर पत्नीला मात्र माझ्या परिवारातील काही लोकांतर्फे मानसिक त्रास सहन करावा लागला .
आमच्या परिवारातील काही सदस्यांनी थेट तिला घरात राहू नका असं बोलून तिला जाण्यास सांगितले. तुम्ही इथे राहिलात आणि त्यामुळे आम्ही पॉसिटीव्ह आलो तर आम्ही काय करायचं हा प्रश्न तिच्यासमोर उपस्थित केला जेव्हा कि ती कोविड नेगेटिव्ह होती . आणि या कारणावरून तिच्यासोबत वाद घालून तिला शिवीगाळ सुद्धा केली आणि टोमण्यांचा भडिमार झाला तो वेगळाच .
जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा आम्ही रुग्णालयात उपचार घेत होतो . माझे वडील व्हेंटिलेटर वर होते आणि त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती . त्याच्या ५-६ दिवसांनी त्यांचा कोविड ने मृत्यू झाला … आणि असा दुर्व्यव्हार करणारे लोक अशिक्षित नव्हे तर उच्चशिक्षित लोक होते ज्यांना या आजाराविषयी भरपूर माहिती होती .
हे सगळं मला कळल्यावर मात्र मी NMC च्या Health Department सोबत संपर्क करून संबंधित लोकांची तक्रार केली आणि त्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला . पोलिसांकडून चेतावणी भेटल्यानंतर मात्र हे सगळं थांबलं पण आपलं समझणाऱ्या लोकांनी असं काही करावा हे अपेक्षित नव्हतं.
या वेळात कुटुंबाच्या बाकी सदस्यांनी व मित्र मंडळींनी आम्हाला मदत सुद्धा केली आणि हवा तो आधार दिला. पण अशा बिकट परिस्थितीत झालेला हा मनस्ताप विसरण्यासारखा नव्हता .
समाजात ज्या डॉक्टरांना “कोविड योद्धा” म्हंटलं जातं त्यांना घरूनच किंव्हा जवळच्या माणसांकडून अशी वर्तणूक मिळाल्यावर हार पत्करावी लागली असं वाटत असेल तर त्यात चूक काय ?
२१ शतकात जिथे आपण शिक्षण , औद्योगिक कलाविज्ञान, क्रीडा क्षेत्रात प्रगती करत असतांना आपले विचार इतके बुरसटलेले का?
लेखकाबद्दल -
डॉ. महेश नरड यांचे अंतरभारती होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, नागपूर येथून B.H.M.S चे शिक्षण पूर्ण झालेले आहे . त्यांना व्यायामाची व विविध क्रीडासंबंधी बाबींची प्रचंड आवड आहे .
Comments